नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले `तो काय देशाचा मोठा नेता होता का?`
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान नारायण राणे यांनी मात्र तो कोण देशाचा मोठा नेता होता का? अशी विचारणा केली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी भाजपा मोहोळ कुटुंबीयांच्या पाठीशी असून शरद मोहोळने हिंदुत्वासाठी जे काम सुरू केलं ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं अशी प्रतिक्रियाही दिली. मात्र दुसरीकडे नारायण राणे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद मोहोळला प्रसिद्धी देण्यावरुन नाराजी जाहीर करताना तो कोण देशाचा मोठा नेता होता का? अशी विचारणा केली.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
नारायण राणे सिंधुदुर्गात असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी
कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या सकाळ संध्याकाळ बातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की? कोण विद्वान होता? असा प्रश्न उपस्थित केला.
सोलापुरात नितेश राणे आणि टी. राजा यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी असे गुन्हे दाखल होतात, त्यात काय? तुम्ही वकील देणार का असा प्रश्न पत्रकारांना विचारला. तुम्ही नको ते प्रश्न विचारू नका असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.
नितेश राणेंनी घेतली मोहोळच्या कुटुंबाची भेट
नारायण राणे यांनी शरद मोहोळला प्रसिद्धी देण्यावरुन नाराजी जाहीर केलेली असताना दुसरीकडे भाजपा आमदार आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे आज पुण्यात पोहोचले होते. त्यांनी शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "भाजप मोहोळ कुटुंबीयांच्या पाठीशी असून शरद मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी जे काम सुरू केलंय ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं. मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केलं. सामान्यांच्या अडचणी सोडवल्या. या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहणे, हे आमचे काम आहे". प्रसारमाध्यमांनी मोहोळ यांच्याविषयी चुकीची माहिती छापू नये, असे आवाहनही यावेळी नितेश राणे यांनी केले.
'माझा पती वाघ होता, मी त्याची वाघीण'
'राज्य सरकार आणि प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. माझा नवरा हिंदुत्ववादी होता, हिंदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून माझ्या नवऱ्यासोबत अशी घटना घडली. जर समोरच्या लोकांना असं वाटत असेल की, अशा घटनेमुळे मी खचून जाईल, तर त्यांनी लक्षात ठेवावं, माझा नवरा हा वाघ होता आणि मी त्यांची वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी का करणार,' असं शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ म्हणाल्या आहेत.
तीन खुनांचे आरोप असलेला गुंड शरद मोहोळ जामिनावर होता. त्याची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.