रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबाग इथल्या एलसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी एलसीबी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागेत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरीसाठी येणार आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर महाड न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अलिबाग इथल्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) समोर हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते. गेल्या तारखेला राणे स्वतः हजर न राहता वकील पाठवला होता. यावेळी राणे स्वतः हजर राहणार आहेत.


महाड इथं बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत कानाखाली मारण्याची भाषा केली होती. त्यावरून राज्यात विविध ठिकाणी शिवसेनेच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी महाड येथे दाखल गुन्ह्यात राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथून 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.