नवं सरकार हे स्थगिती सरकार, कोकणाचा विकास रखडला- नारायण राणे
भाजप नेते नारायण राणे यांनी नव्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी नव्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्री नाहीत, खाती नाहीत, हे तीन पक्षांचं सरकार आहे, या पक्षाचं कोकणात अस्तित्व दिसत नाही, यामुळे कोकणात विकास कामं ठप्प झाली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच भाजप नेते १५ ते १८ डिसेंबर दरम्यान सिंधुदूर्ग दौरा करणार असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.
हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही, हे पाहुणं सरकार आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी तीनही पक्ष एकत्र आले आहेत, नवं सरकार म्हणजे स्थिगिती सरकार आहे, आर्थिक फायद्यासाठी कामांना स्थिगिती दिली जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.तसेच दीपक केसरकर हे थापाडे आमदार असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.
तीन पक्षाचं सरकार राज्याला पोषक नाही. शिवसेनेचे खासदार बेकायदेशीर बैठका घेत आहेत. बेकायदेशीर बैठका, ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.