सिंधुदुर्गात पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटलाय
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलाय.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि कणकवलीत घडलेल्या गोळीबार प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. निमित्त ठरलंय ते गेल्या महिन्याभरात सिंधुदुर्गातली वाढती गुन्हेगारी. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलाय. निमित्त ठरलंय ते गेल्या महिन्याभरात सिंधुदुर्गातली वाढती गुन्हेगारी. राणेंवर शिवसेनेकडून कायमच दहशतवादाचे आरोप करण्यात आलेत. आता शिवसेनेचे दीपक केसरकर हे गृहराज्यमंत्री असल्याने राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आयतं कोलीत सापडलंय. काही दिवसांपूर्वी घडलेली सामूहिक बलात्कारी घटना आणि दुसरी घटना म्हणजे केसरकर यांच्याच पक्षाचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेला हल्ला. सावंतवाडी या केसरकरांच्या मतदारसंघातल्या या घटनांमुळे ते स्वाभिमानच्या निशाण्यावर आलेत.
एका बाजूला केसरकर यांना टार्गेट केलं जात असताना आता शिवसेनेला ही कणकवलीत मुद्दा सापडलाय. स्वाभिमानचे नगरसेवक विराज भोसले यांचे वडील सुभाष भोसले यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या सदनिकेतील फ्लॅट धारक किशोर दाभोळकर यांच्या दिशेने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता. साहजिकच आता शिवसेनेनेही या प्रकारावरून रान उठवलंय. नगरसेवक विराज भोसले यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना करतेय.
लोकसभा- विधानसभा निवडणूक आता तोंडावर आल्याने साहजिकच शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून प्रत्येक मुद्याचं राजकारण होऊ लागलंय. आगामी काळात हे मुद्दे आणखी टोकदार होऊन कोकणात राजकीय धुमशान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.