पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे. पुनाळेकर हे 'सनातन संस्थे'चे वकील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना या आधी शिवाजीनगर न्यायालयाने १ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. आज या दोघांच्याही कोठडीची मुदत संपली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 


दरम्यान, दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत जी माहिती पुढे आली. त्याआधारे पुनाळेकर, भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे.