नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सहकारी पक्ष भाजपवर टीका करताहेत. पंढरपूरमधील सभेत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडव्या शब्दांत हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरून मोदींवर 'चौकीदार चोर है' अशी टीका करताहेत. उद्धव ठाकरे यांनीही या सभेत अशा स्वरुपाची टीका मोदींवर केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी 'एएनआय'ला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आम्हाला सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे, असे सूचक विधान केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराचा निर्णय न्यायालयीन लढाईनंतरच- मोदी


'एएनआय'च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी मुलाखत घेताना मोदी यांना उद्धव ठाकरे यांचे नाव घेत, तुमचे सहकारी पक्षही तुमच्यावर टीका करू लागले असल्याचे सांगितले. 'चौकीदार चोर है'चे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. पण या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आम्हाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार तयार केले. आजही आम्ही सगळ्या मित्रपक्षांना विचारात घेऊनच सरकार चालवतो आहोत. पण प्रत्येक राज्याचे स्वतंत्र असे राजकारण असते. तिथल्या पक्षांचीही मोठे होण्याची इच्छा असते. काँग्रेस ज्याप्रमाणे सहकारी पक्षांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. तशी आमची इच्छा अजिबात नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचीच आमची प्राथमिकता असते, असे मोदी यांनी सांगितले. काँग्रेससोबत जे मित्र पक्ष आहेत. ते त्याच पक्षातून फुटून बाहेर पडलेले आहेत किंवा एकेकाळी ते काँग्रेसला विरोध करण्यासाठीच निर्माण झाले होते. पण ते आता काँग्रेससोबत जातात आणि काँग्रेसही त्यांना गिळून टाकण्यासाठीच सोबत घेते, असेही मोदी म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातून प्रश्न विचारलेला असतानाही त्याचे उत्तर देताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे किंवा त्यांच्या पक्षाचे नाव घेणे टाळले. केवळ सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आमची इच्छा आहे, असे उत्तर त्यांनी दिले.