नाशिक : नाशिकच्या अॅक्सिस बँकच्या एटीएममधून ग्राहकांना पाच पट पैसे येत होते. एका ग्राहकाला याचा अनुभव आला, यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळपासून ही बातमी सोशल मीडियात चर्चेत होती. नाशिकच्या विजयनगरमधील अॅक्सिस बँकच्या एटीएममधून पाच पट किंवा तीन पट पैसे बाहेर येण्याचं कारण तांत्रिक बिघाड हे असू शकतं असं सामान्यपणे सांगता येईल. पण यातील दुसरं कारण सर्वात महत्वाचं आहे, आणि या कारणामुळे नाशिकच्या एटीएममधून तीन पट किंवा पाच पट जास्त पैसे जास्त आलं असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, काही महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये अशीच घटना घडली होती, लोकांना ३ पट जास्त पैसे एटीएममधून येत होते, यानंतर बँकेसमोर जास्तीचे पैसे काढणाऱ्यांची रांग लागली. बँकेला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पैसे काढणाऱ्यांची माहिती सिस्टममधून काढली आणि त्यांना फोन लावून जास्तीचे पैसे परत करण्याची विनंती केली, त्यातील फार कमी लोकांनी जास्त घेतलेले पैसे परत केले. पण काहींनी परत केले नाहीत. आपण जास्त पैसे काढलेच नसल्याचा दावा काही ग्राहकांनी केला. मात्र यामागचं कारण एक साधी पण मोठी चूक होती, ती कदाचित तांत्रिक नव्हती तर कॅश भरणाऱ्या माणसांनी केलेली चूक होती.



कारण एटीएममशीनमध्ये नोटांचे ट्रे असतात, पाचशे, शंभर, दोन हजार अशा नोटांचे ट्रे असतात, पण शंभर रूपयांच्या नोटांच्या ट्रेमध्ये जर दोन हजाराच्या नोटा ठेवल्या गेल्या, तर फार मोठा घोळ होतो. अशावेळी जर ग्राहकाने १०० रूपये काढले, तर त्याला चक्क २ हजार रूपये हातात येतात. कारण मशीनला ट्रेची कमांड दिलेली असते, पैशांची नाही. पाचशे रूपयांच्या नोटांच्या ट्रेमध्ये जर २ हजार रूपयांच्या नोटा कॅश भरताना ठेवल्या, तर ग्राहकाने ५०० रूपये काढले की, २ हजार रूपये हातात येतात.


अनेक एटीएम कंपन्यांच्या ट्रेमध्ये त्याच नोटा बसतात, ज्या ठरलेल्या आहेत, पण अनेक वेळा आणि नोटबंदीनंतर ट्रेची सेटिंग बदललीय, कारण नोटांचीही साईझ बदललीय, त्यामुळे हे घोळ होतात, पण हा घोळ तसा स्वस्त नाहीय. गरीब कर्मचाऱ्यांकडून अशी चूक झाली तर त्यांच्यासाठी हा फार मोठा पश्चाताप नक्कीच आहे. नाशिकमध्ये जास्तीचे पैसे जाण्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं, तरी या आधी घडलेल्या घटनांमध्ये चुकीच्या ट्रेमध्ये नोटा भरण्याच्या घटना झाल्या आहेत.