भाडेकरु दहशतवाद विरोधी पथकाच्या निशाण्यावर
दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक महापालिकेकडे शहरातल्या भाडेकरूंची माहिती मागवली आहे. शहरात कोण राहतं त्यांची पार्श्वभूमी काय या संदर्भातली माहिती घरमालकांकडून प्राप्त होत नसल्याने एटीएसने थेट महापालिकेकडेच माहिती मागितल्याने खळबळ उडालीय.
मुकुल कुलकर्णी, नाशिक : दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक महापालिकेकडे शहरातल्या भाडेकरूंची माहिती मागवली आहे. शहरात कोण राहतं त्यांची पार्श्वभूमी काय या संदर्भातली माहिती घरमालकांकडून प्राप्त होत नसल्याने एटीएसने थेट महापालिकेकडेच माहिती मागितल्याने खळबळ उडालीय.
गुन्हेगारीत प्रचंड वाढ
नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झालीय. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शहरात येऊन राहिले आहेत. इतर राज्यातले तडीपार नाशिकमध्ये आसरा घेतायत. शहरात आणि भोवती अनेक संवेदनशील ठिकाणं असल्याने या गुंडांचा प्रश्न गंभीर आहे.
भाडेकरूंची माहिती देण्याची ताकीद
नाशिक पोलिसांनी यासंबंधी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याची ताकीद दिली होती. पण ही सूचना कोणीच गांभीर्याने घेतली नाही. घरमालक पोलिसांना जुमानत नसल्यामुळे अखेर दहशतवाद विरोधी पथकाने थेट महापालिकेकडूनच भाडेकरूंची माहिती मागवली आहे.
मनपा प्रशासन कामाला
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही शहरातून केवळ सव्वाचार हजार भाडेकरूंची माहिती प्राप्त झालीय. दहशतवाद विरोधी पथकाने आता मागणी केल्यानंतर मनपा प्रशासन तातडीने कामाला लागलंय.
भाडेकरु ठेवताना...
ज्या घरात भाडेकरू पोट भाडेकरू राहतात त्या घरमालकांना महापालिकेकडून अतिरिक्त घरपट्टी, पाणीपट्टी लावली जाते. करात वाढ होत असल्यान बहुतांश घरमालक भाडेकरूंची माहिती देण्याचं टाळतात. कुठलीही खातरजमा न करता देवून केवळ पैसा कमविण्यासाठी घरमालक आपले घरच गुन्हेग्गारांच्या ताब्यात देत नाहीत तर शहराची सुरक्षाही धोक्यात घालत आहेत.
भाडेकरूंची माहिती मिळेल का?
मतांच्या राजकारणासाठी शहरातील लोकप्रतिनिधीही कुठलीही पडताळणी न करता ओळखीचा आणि रहिवासी दाखला देऊन मोकळे होतायेत. त्यामुळे एटीएसने पत्र देवूनही महापालिकेकडून सर्व भाडेकरूंची माहिती मिळेल का हा प्रश्न कायम आहे.