सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Police) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मंदिरांचे शहर असलेल्या नाशकात वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घडल्याचे समोर येत आहे. अशातच आता वडिलांना केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणाचा निर्दयीपणे खून केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पोलिसांनी (Nashik Police) अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशकात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी वडिलांना मारहाण केल्याचा राग आल्याने त्याचा सूड म्हणून एका टोळक्यानेसागर शिंदे या युवकाचा खून केला आहे. पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील गुंजाळ मळा परिसरात 26 वर्षीय सागर शिंदे या युवकाचा पाच ते सहा जणांनी डोक्यावर मानेवर धारदार चॉपरने वार करत खून केला होता. आता या प्रकरणाचा उलघडा झाला आहे. 


सागर शिंदेंच्या हत्येनंतर फरार झालेल्या संशयितांपैकी चौघा जणांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या पथकाने निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथून चार तासांच्या आत ताब्यात घेत अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित केदार इंगळे याच्या वडिलांना मयत सागर याने मारहाण केली होती. याचा राग आल्याने सूड म्हणून मुख्य संशयित केदार याने इतर साथीदारांच्या मदतीने सागर याची धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे. या घटनेतील इतर फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.


पोलिसांनी काय सांगितले?


"शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरे मळा या ठिकाणी सागर शिंदे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर शिंदेचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता पाच ते सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पण्ण झालं. याप्रकरणी भादवि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. पथकाने या गुन्ह्यातील मुख्य चार आरोपींना निफाड तालुक्यातून अटक केली. आरोपींनी धारदार शस्त्राने सागर शिंदे याच्यावर वार केले होते. दोन दिवसांपूर्वी मयत शिंदे याने आरोपी केदार इंगळेच्या वडिलांना मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपी केदार इंगळेने त्याच्या इतर साथीदारांसह  सागर शिंदे याची हत्या केली," अशी माहिती पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.