Sudhakar Badgujar : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या प्रकरणावरुन अडचणीत सापडलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुधाकर बडगुजर यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. सलीम कुत्ताच्या व्हिडीओ प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील बडगुजर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून महानगरपालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासमवेत डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे  नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. गेल्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजप आमदार नितेश राणे, दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरु झाली होती. त्यानंतर आता सलीम कुत्ता प्रकरणात बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुधाकर बडगुजरांचे स्पष्टीकरण


व्हायरल व्हिडीओप्रकरणी सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. "माझ्यावर राजकारणात येण्याआधी एकही गुन्हा दाखल नव्हता. ज्या काही केसेस दाखल आहे त्या राजकारणात आल्यानंतर राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सलीम कुत्ताला 92-93 मध्ये अटक झाली असेल. 2016 मध्ये मला अटक झाली. माझे ना कधी त्याच्याशी संबंध होते आणि यापुढेही नसतील. हा प्रकार मॉर्फिंगचा असून गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? तो पेरोलवर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ शकतो. तिथे भेट झाली असेल तर माहिती नाही.  राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. बुद्धिबळाचा खेळ सुरु असतो. त्याबद्दल फार काही बोलण्यात अर्थ नाही. पोलिसांना चौकशीत माझं सहकार्य असेल," असं बडगुजर यांनी स्पष्ट केलं होतं.