योगेश खरे झी मीडिया नाशिक : चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  एका नराधम बापाने पोटच्या लेकराला उलटं टांगून अमानुष मारहाण केली. या लेकराचा गुन्हा काय तर तो सतत आजारी असतो. वारंवार आजारी पडत असल्यानं या मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. दवाखान्याचा खर्च मोठा असल्यानं संतापलेल्या बापानेच एखाद्या आरोपीला करावी अशी जिवघेणी मारहाण लेकराला केलीय.  मंगेश नंदू बेंडकुळे असं या निर्दयी बापाचं नाव आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला मारहाण करुन तो नराधम थांबला नाही बायकोलाही या प्रकरणी अमानुष मारहाण केली. या प्रकरणी या मुलाच्या आईने नवरा मंगेश नंदू बेंडकुळे याच्याविरोधात वडनेर भैरव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय. आईच्या फिर्यादीवरून निर्दयी पित्याविरोधात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून घेत आता वडिलांना अटकेची तयारी सुरू केलीये.  कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे.


मात्र मुलाचे वडील बुवाबाजी करत असल्यानं उलटे टांगून मंत्रोपचार करत अघोरी प्रकार केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. या बाजूनेही चौकशी करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलीय. मुलाच्या सततच्या आजारपणाला कंटाळून या निर्घुण बापाने लेकराला केलेली मारहाण काळीज पिळवटून टाकणारी आहे.  अशा निर्दयी बापाला कठोर शासन करण्याची मागणी आता जोर धरू लागलीय..