Nashik Crime : वडिलांपासून वाचण्यासाठी आईच्या खोलीत पळाला अन्... नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार
Crime News : नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचाच यामध्ये मृत्यू झाला आहे
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या (Nashik News) सिडको भागातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये वडिलांनीच पत्नी आणि मुलाच्या हत्येचा प्रयत्न (Crime News) केल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात वडिलांचाच मृत्यू झाला आहे. नाशिकच्या सिडको भागातील अश्विननगरमध्ये एका 57 वर्षीय उद्योजकाने पत्नीवर आणि 18 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. या सर्व प्रकारानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात देव आशिष कौशिक याने आपल्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशिष कौशिक हे उद्योजक असून पत्नी ज्योती व मुलगा देवसह ते अश्विननगर येथील शिव बंगल्यात राहत होते. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास उजव्या हातावर वार झाल्याने खोलीत झोपलेल्या देवला जाग आली. त्यावेळी आशिष कौशिक यांच्या हातात त्याला चाकू दिसला. त्यानंतर वार करण्यासाठी आशिष कौशिक पुढे आले असता देवने तिथून पळ काढला आणि आईची खोली गाठली. त्यानंतर दरवाजा बंद केला. मात्र आईच्या खोलीत पोहोचताच देवला मोठा धक्का बसला.
आईच्या खोलीत पोहोचल्यावर देवला ज्योती कौशिक या पलंगावर जखमी अवस्थेत आढळल्या. पलंगावरील संपूर्ण गादी ही रक्ताने भरली होती. त्याने हा सर्व प्रकार त्यांच्याकडे काम करणाऱ्याला आणि आशिष कौशिक यांच्या मित्राला फोनवरुन सांगितला. त्यांनी हा सर्व प्रकार ऐकून तात्काळ घराकडे धाव घेतली. घरामध्ये पोहोचल्यावर त्यांना आशिष कौशिक घे जमिनीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी देव आणि ज्योती कौशिक यांना उपचारांसाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये तर आशिष कौशिक यांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र आशिष कौशिक यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे आशिष कौशिक यांनीच आपल्या आईवर तसेच आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार देवने पोलिसांत दिली आहे. मात्र आशिष कौशिक यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्वतः आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
"अंबड पोलीस ठाण्यात हद्दील छत्रपती स्टेडियमच्या बाजूला असलेल्या शिव बंगल्यात आशिष नावाचे व्यावसायिक राहतात. त्यांनी पहाटेच्या सुमारास पत्नीला चाकूने भोकसले होते. मुलाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कौशिक यांच्या जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या तक्रारीवरुन तपास सुरु आहे. आशिष कौशिक हे सुद्धा खोलीत पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यावरुन पुढील तपास करण्यात येईल. आशिष कौशिक यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते," अशी माहिती नाशिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.