योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात अशा काही घटना घडतायत की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण होईल. या घटनांमुळे राज्याच्या बऱ्याच भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता नाशिकच्या (Nashik Crime) इगतपुरीमध्ये गौवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीमध्ये आणखी एक तरुण जखमी झाल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवंशाची अवैध वाहतूक (cattle trafficking) केल्याप्रकरणी तिघांना काही स्थानिक तरुणांनी कसारा (Kasara) परिसरात 8 जूनला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे. कसारा येथे मुंबई महामार्गावर 15 ते 16 जणांनी गुरे घेऊन जाणारी जीप अडवली होती. जीपमध्ये मृत तरुणासह तिघे प्रवास करत होते. त्यांच्यात पैशांवरूनही वाद झाल्याचे म्हटलं जात होतं. त्यानंतर मारहाण झालेल्यांपैकी एकजण बेपत्ता झाल्याची तक्रार मृत तरुणाच्या वडिलांनी दिली होती. त्यानंतर 10 जून रोजी बेपत्ता तरुण इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरातील उंट दरीत मृतावस्थेत सापडला होता. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण झाली त्या दिवशी जखमींना मारेकऱ्यांनीच पोलीस स्टेशनला आणले होते. पण पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.


इगतपुरी पोलिसांनी याप्रकरणी याप्रकरणी खुनाचा गुन्हाचा दाखल केला आहे. तीन दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घटनेत मारहाण करणाऱ्या सहा संशयित आरोपींना इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने सहा आरोपींना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


नेमकं काय घडलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जूनच्या रात्री एका टेम्पोत गोवंश घेऊन पप्पु अतीक पड्डी (36), अकील गुलाम गंवडी (25) आणि लुकमान सुलेमान अंसारी (25) हे तिघे जण निघाले होते. त्यावेळी कारेगाव येथून 15 ते 20 जणांच्या जमावाने त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारहाण केली. यावेळी अकील गुलाम गंवडी हा तिथूव पळून गेला. त्यानंतर जमावाने त्यांना कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर आणले आणि पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी लुकमान सुलेमान अंसारी याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पळत असताना दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 जून रोजी  सुलेमान अंसारी याचा मृतदेह 250 फुट खोल दरीत आढळून आला. त्यानंतर हा मृतदेह बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.