सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच एका अल्पवयीन मुलीच्या हत्येने नाशिक शहरात (Nashik Crime) खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये सोशल मीडियावरील मैत्री एका मुलीच्या जीवावर बेतली आहे. पाच मजली इमारतीवरुन आरोपीने दहावीत शिकणाऱ्या मुलीला फेकून दिल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. इमारतीवरुन पडल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. तरुणानेच अल्पवयीन मुलीला इमारतीवरुन फेकून दिल्याची बाब उघडकीस आलीय. पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासामध्ये मृत मुलगी ज्या मुलाशी चॅटिंग करत होती त्यानेच तिला इमारतीवरून मुलीला ढकलून दिल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी विनायक जाधव याला अटक केली आहे. संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिकचा तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे.


नाशिकच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या विनायक जाधव या तरुणाची एका अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या आठवड्यात रात्री विनायक आणि मृत अल्पवयीन मुलगी इंदिरानगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर गप्पा मारत होते. यावेळी झालेल्या किरकोळ वादातून विनायकने मुलीला पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


पोलिसांनी काय सांगितले?


"इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगी इमारतीच्या टेरेसवरुन पडल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जाधव नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 6 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनाचा तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे. मुलीला इमारीवरुन ढकलून देण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. दोघांचेही चॅटिंग तपासण्यात येणार आहे. प्रेमसंबंधातूनच ही घडली आहे. या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु करण्यात आला आहे," असे नाशिक शहर पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.