सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सापडलेला मोबाइल परत देण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून या तरुणावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा रविवारी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) तीन संशयितांवर खुनाचा गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. तर हत्या करणाऱ्या दोघांना अद्याप पोलिसांनी अटक केली  नसल्याचे मुलाच्या वडिलांनी म्हटलं आहे. 8 एप्रिल रोजी हा सर्व प्रकार घडला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सिडको परिसरात सापडलेला मोबाइल परत देण्यासाठी गेल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून तरुणाला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला होता. रविवारी उपचारादरम्या या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात मयत युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघा संशयितांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली..


मृत नितीन गणपत जाधव (30) याला 7 एप्रिल रोजी एक मोबाईल सापडला होता. ज्या व्यक्तीचा हा मोबाईल आहे तो त्याला परत देण्यासाठी 8 एप्रिल रोजी त्रिमुर्ती चौकात गेला होता. यावेळी नितीनने पत्नीसोबत आक्षेपार्ह संवाद साधल्याचा संशयितांचा दावा होता. त्यामुळे नितीनल निलेश दिनकर ठोके (33 कामाठवाडे) आणि त्याच्या दोन साथीदारांनी जबर मारहाण केली होती. यावेळी आरोपीने, तू माझ्या पत्नीला फोन का करतो असे विचारले आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. मारहाणीनंतर जखमी झालेल्या नितीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असताना 23 एप्रिल रोजी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी नितीनचे वडील गणपत जाधव यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र रविवारी नितीनचा मृत्यू झाल्याने अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपात विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.


इतर आरोपींना अटक करण्याची वडिलांचा मागणी


"माझ्या मुलाला 7 एप्रिल रोजी मोबाईल सापडला होता. त्याच दिवशी त्याला रात्री मोबाईलवर फोन आला होता. त्यानंतर आठ तारखेला मुलगा मोबाईल देण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. मानेला मार लागल्यामुळे दोन ते तीन दिवस तो सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होता. त्यानंतर सुविधा नसल्याने त्याला आडगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या 13 ते 14 दिवसांपासून तो तिथे दाखल होता. पल्लवी निलेश ठोके, प्रसाद मुळे आणि अन्य एकजण यांनी मुलाला जबरदस्त मारहाण केली. अंबड पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पल्लवी ठोके यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांना अटक होऊन शासन व्हायला हवे. पोलिसांनी इतरांना अटक केल्याचे सांगितले आहे. परंतु इतर दोघांना अटक करण्यात आलेली नाही," मृत मुलाचे वडील गणपत जाधव यांनी सांगितले.