योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashi Crime) एका तरुणाची निर्घृण हत्या घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन संशयित आरोपींनी 21 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जीवे ठार मारले आहे. आरोपींनी तरुणाच्या दुचाकीचा पाठलाग करत त्याला गाठलं आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. शनिवारी रात्री आरोपींनी तलवारीने सपासप वार करत तरुणाचा खून केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुषार एकनाथ चौरे (वय 21 रा. विनय नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणा रोडवरील बोधले नगर येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. रात्री उशिरा पर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार चौरे हा तरुण बोधले नगर येथील एका दुकानात कामाला आहे. तुषार आणि त्याचा मित्र दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीने आलेल्या तीन संशयितांना चौरेच्या दुचाकीला लाथ मारली. तुषार आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन पडताच संशयितांनी धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चौरे गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरील तुषार चौरेच्या मित्राने तिथून पळ काढल्याने तो वाचला आहे. रात्रीची वेळ असल्याने संशयितांची ओळक पटली नाही. भररस्त्यातच हा थरार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर तुषारचे मित्र आणि नातेवाइकांनी गर्दी केल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


तलवारीने हात तोडणाऱ्या तीन आरोपींची पोलीसांनी काढली धिंड


नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून मजुरावर तलवारीने हल्ला करून हात तोडणाऱ्या आरोपींची पोलीसांनी भर रस्त्यावरून धिंड काढली. गुंडगिरी करणाऱ्या आरोपींची दहशत कमी व्हावी म्हणून नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोमलवाड यांना या आरोपींना रस्त्यावरून फिरवले. तरोडा नाका भागात पार्किंग करण्यावरुन आरोपींनी त्रिशरण थोरात यांच्यावर तलवारीने वार करून मनगटापासून हात छाटला होता. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरज बसवते, आकाश रणमले, विजय जाधव यांना अटक केली. गुन्हेगारामध्ये वचक रहावी या उद्देशाने पोलीसांनी आरोपींची धिंड काढली.