सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik) शहरात एक अतिशय  धक्कादायक घटना समोर आलीये. आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आलीये. शहरातील गंगापूर रोड वरील धृवनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडलीये. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी (Nashik Police) अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय. धृवांशी भूषण रोकडे वय 3 महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. काल रात्री ही घटना घडलीय, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (three-month-old girl was killed by an unknown woman)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्ञात महिलेचा घरात प्रवेश
नाशिक शहरातील गंगापूर सातपूर लिंक रोड इथल्या  धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे  पत्नी, आई आणि 3 महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर इथल्या एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. तेव्हा घरात त्यांच्या आई, पत्नी आणि धृवांशी होती. संध्याकाळी भूषण यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. या संधीचा फायदा घेत एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली.या महिलेने धृवांशी हिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. आई बेशुद्ध झाल्यानंतर या क्रूर महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिल्याच्या निरागस धृवांशीचा धारधार शस्त्राने गळा चिरला. 


चिमुकल्या धृवांशीची निर्घृण हत्या
काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. त्यावेळी समोरचं दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सून बेशुद्ध अवस्थेत होती, तर चिमुकली धृवांशी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी आरडाओरडा करुन या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली.त्यानंतर शेजाऱ्यांनी धृवांशी आणि तिच्या आईला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेण्याआधीच चिमुकल्या धृवांशीचा मृत्यू झाला होता. 


हत्येने अनेक प्रश्न उपस्थित
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक सह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुठल्या कारणातून झाली याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र मुलीच्या आईने एका महिलेवर संशय व्यक्त केला असून सोमवारी रात्री उशिरा पर्यंत पोलिस अधिकारी घटनास्थळी तपास करत होते. मुलीची आईकडे पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आलीये. 


दरम्यान, ती अज्ञात महिला कोण होती? रोकडे कुटुंबियांचं कोणाशी पूर्ववैमनस्य होतं का? अवघ्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या करण्यामागे नेमका हेतू काय? असे सवाल या घटनेने उपस्थित होतायत.