राज्यात चाललंय काय? केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं
Nashik Crime : नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यांत 29 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांना लांबवल्याचे समोर आल्यानंतर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकमध्ये आता मंत्री राजकारणी असलेल्या लोकांचे नातेवाईकसुद्धा सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (MP Bharti Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात चेन स्नॅचिंगचा हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सर्वसामान्यांसह नेतेमंडळीही असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहेत.
नाशिक शहरात सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असताना आता आमदार खासदार आणि मंत्र्यांचे कुटुंबीय ही असुरक्षित झाली आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातून दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र पळवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीये. भारती पवार यांच्या आई शांताबाई बागुल या आरटीओ परिसरातील बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.
याप्रकरणी शांताताई बागुल यांच्या तक्रारीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन ते अडीच तोळ्याच्या मंगळसूत्राच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलेही हेल्मेट न घालता दुचाकीस्वारांनी राजरोसपणे चेनस्नॅचिंग केल्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याच समोर येत आहे.
नुकतीच आमदार सीमा हिरे यांनी अंबड पोलीस स्टेशनला नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन करत गुन्हेगारीला नियंत्रण करण्याची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनाही त्यांनी याबाबत तक्रार केली होती. आता थेट केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या आईलाच या गुन्हेगारीचा फटका बसल्याने सर्वसामान्यांची काय व्यथा असेल असा सवाल विचारला जात आहे. गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात खाकीचा धाक उरला नसल्याच समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
"भाजी घेऊन येत असताना एक गाडी हळू हळू माझ्याकडे येत होती. मला वाटलं माझ्याकडून त्यांना काही माहिती हवी आहे. तितक्यात त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. त्यामुळे मी पुढे चालत निघाले. त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळाले आणि बघत होते मी काही ओरडते का. पण मला काहीच सुचेनासे झाले. ओरडले असते तरी कोणीच ऐकलं नसतं. दोघेही स्कूटीवर आले होते. आयुष्यात पहिल्यांदा भाजी घ्यायला गेले आणि हे असं झालं. मी त्यावेळी एकटीच होती. दुर्गानगर परिसरात सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली," असे शांतताई बागुल यांनी सांगितले.