योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला. त्या कावळ्याच्या भोवती अनेक जण श्राद्धाच्या नैवेद्याची ताटं घेऊन फिरत आहेत. कावळ्याने ताटातल्या नैवेद्याला चोच लावल्यावर भाविकांना श्राद्धकर्म पूर्ण झाल्यासारखं वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच आणखी एक प्रकार नाशिकच्या अमरधाम जवळ घडला. असा काकस्पर्श होण्यासाठी एक कावळा झाडावर अडकवण्यात आला. पक्षीप्रेमींनी त्याला सोडवलं खरं पण त्याआधी त्याच कावळ्याला पकडून अनेकांनी काकस्पर्शाची आपली मनोकामना पूर्ण केली. पक्षीप्रेमींनी याबाबत निषेध व्यक्त केलाय. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.


सध्या पितृपक्षात पितरांचं श्राद्ध घालण्यासाठी मोठी गर्दी नाशिकमध्ये गोदाकाठी होते. घरोघरी पितरांसाठी नैवेद्यही केला जातोय. या नैवेद्यातला घास कावळ्याने खाल्ला की श्राद्धकर्म पूर्ण होतं अशी श्रद्धा आहे. मात्र कावळेच कमी झाल्यामुळे भाविकांना ताटकळत राहावं लागतंय.


पूजाविधी कर्मकांड करताना माणुसकी विसरली जात आहे हे सातत्याने समोर येतं. त्र्यंबकेश्वरच्या कर्मकांडाविरोधात झी २४ तासने सातत्याने आवाज उठवला आहे. आता हा प्रकार समोर आल्याने श्रद्धेला कोणतं विकृत स्वरूप येत चाललंय हेच दिसून येतंय.