एकाच दिवशी दोन संकटं! मायलेकीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू, तर मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी
Nashik News: नाशिकमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अधिकमासात आपल्या माहेरी आलेल्या मुलीचा तिच्या आईसह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत तिची दोन मुलं आणि पती थोडक्यात बचावले. तर दुर्घेटनेची माहिती मिळताच बाजारात गेलेल्या मुलगा परतत असताना त्याच रस्तात अपघात झाला.
सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : जिल्ह्यातील ओझर परिसरात मायलेकीचा मृत्यू झाल्याची एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अधिकमास म्हणजेच धोंड्याचा महिना. धोंड्याकरिता आकांक्षा रणशूर ही विवाहित महिला कुटुंबासह ओझर इथल्या आपल्या माहेरी आली होती. आजीच्या घरी आल्याने नातवंड सुद्धा आनंदी होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्या कुटुंबियावर काळाने घाला घातला. 25 वर्षांची आकांक्षा दोन मुलांसह माहेरी म्हणजे आई मीना सोनवणे हिच्याकडे आली होती. रविवार असल्याने आकांक्षा, आई मीना आणि दोन मुलांसह घराजवळ असलेल्या झाडावरचे पेरु तोडण्यासाठी गेली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या उच्च दावाच्या वीजवाहिनीचा शॉक (Electric Shock) लागून आकांक्षा आणि आई मीना यांचा जागीच मृत्यू (Daughter and Mother Died) झाला. तर दोन मुलं किरकोल जखमी झाले आहेत. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशी घडली घटना
आकांक्षा रणशूर हिचं सासर नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि माहेर ओझर इथं आहे. अधिक मास असल्याने आकांक्षाच्या आईने मुलगी, जावई आणि नातवंडांना रणशूर परिवाराला जेवणासाठी बोलावले होतं. यासाठी रणशूर परिवार शनिवारी ओझरला पोहोचले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आकांक्षा, आई मीना, दोन मुलं आणि पतीसह घराच्या गच्चीवर गेले. घराजवळच पेरूचे झाड होतं. नातवंडाना पेरू खाऊ घालण्यांसाठी आजी आणि आई झाडाजवळ गेले. त्यांच्यासोबत दोघ नातू सुद्धा गेले. मात्र पेरू तोडत असताना हातात असलेला लोखंडी रॉड हा घराजवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना लागला. यात मीना आणि आकांक्षा या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर जावई आणि दोन नातवंडे शॉकमुळे लांब फेकले गेल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
मीना सोनवणे यांचा मुलगा गंभीर जखमी
घरात दुर्घटना झाल्याचे समजताच मीना सोनावणे यांचा मुलगा दुचाकीवरून घरी परतत होता. मात्र दुर्दैवाने त्याचा वाटेतच अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वीजवाहिनी भूमिगत करण्याची नागरिकांची मागणी
नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ह्या घराजवळून गेल्या आहेत. यामुळे आता पर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यात अनेकांचे प्राण सुद्धा गेले आहेत. काही दिवसांपूर्वी गच्चीवर कपडे वाळत टाकण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला होता तर याच प्रकारे नाशिकच्या सिडको भागात शॉक लागून मुलाचा मृत्यू झाला होता. वाढते अपघात बघता नागरिकांनी वीजवाहिनी भूमिगत करण्यात मागणी केली आहे.