शिक्षकांना सफारी, शिक्षिकांना नथ, नाशिकमध्ये शिक्षक मतदारांना आमिष?
Teacher Constituency Election : नाशिकमध्ये शिक्षक आमदार होण्यासाठी साम, दाम, दंड भेद रणनीती वापरली जातेय. शिक्षक मतदारांना मौल्यवान वस्तूंचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे नाशिक शिक्षकच्या निवडणुकीला वेगळंच वळण लागलंय.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नाशिकमधलं वातावरण तापलेलं आहे. मात्र त्याचवेळी शिक्षक मतदारांना (Teachers Voters) आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिक्षक मतदारांना नथ आणि पैठणी तर काही ठिकाणी सफारीचं कापड आणि पैशांची पाकिटं वाटण्यात आल्याचे फोटो व्हायरल झालेत. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णींनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तशी तक्रार केलीय.. याआधीच जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलेले शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) केला होता. आता शिक्षक मतदारांना नथ, पैठणी, सफारीचं कापड वाटल्याची तक्रार आहे.
मतदारांना आमिषं
नाशिक विभागात पाच जिल्ह्यात महाराष्ट्र विधान परिषद नाशिक शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2024 ची आचार संहिता सुरू आहे. ही निवडणूक गाजली ती अर्ज भरण्यापासून. डुप्लिकेट उमेदवारांचा भरणा झाल्याने पहिल्याच दिवशी उमेदवारांमध्ये झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. आता जळगाव मध्ये पैसे वाटण्याचा व्हिडिओ तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यामध्ये नथ आणि साडी तर काही ठिकाणी सफारी रोकडचे पाकीट वाटण्यात येत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
याच नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक मतदारही बोगस असल्याचा प्रकार समोर आला होता. शिक्षक नसतानाही हॉटेलवाले तसंच छोटे मोठे व्यावसायिक शिक्षक मतदार दाखवल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षक आहोत याचं भान ठेवा असा सल्ला ज्येष्ठ नेत्यांनी शिक्षक मतदारांना दिलाय. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने नाशिक शिक्षक मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्वरीत चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदान करण्यासाठी विविध वस्तूंची आणि रोकड रकमेची वाटप होत असल्याचं नाशिकचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे तर उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी वाटप करण्यात आलेल्या वस्तू नकली असल्याचे म्हटले आहे
शिंदे वि. ठाकरे गट
नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवेंना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होणार आहे. या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मात्र एकूणच घडलेल्या घटनांमुळे शिक्षकांची ही निवडणूक शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ठरली आहे.