मुंबई / नाशिक : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे नाशिक  (Nashik ) जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण 55 ठिकाणी ऑक्सिजन (oxygen) जनरेशन प्लांटच्या माध्यमातून 50 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. यामाध्यमातून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंधामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, मृत्यूदर अजून घटलेला नाही. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि जिल्हा रेड झोन बाहेर कायम राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन  छगन भुजबळ यांनी केले. कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने बाजारात होणारी गर्दी टाळावी व सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी शहरात स्वच्छता ठेवावी व पावसाळापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश भुजबळ यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना  दिले.


पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  येवला येथील ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 6, मालेगाव महानगरपालिका  क्षेत्रात 2, जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात 9, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगांव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या 24 ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. 


तसेच केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या 4 ठिकाणी तर सिक्युरीटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाणे तसेच नाशिक ग्रामीणसाठी 5 असे एकूण 55 ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाची व कोविड सेंटरची पाहणी केली.