योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात तिसरीतल्या एका मुलीने व्यसनमुक्तीचे व्रत हाती घेतले आहे. शहरात जवळजवळ 50 जणांचे धूम्रपान तिने यशस्वीरित्या सोडवल आहे. आपल्या स्वतःच्या घरातच शालेय शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा सर्वच तरुणांनी आदर्श घेण्याची गरज आहे. रिध्या वस्पते असे या बहादुर चिमुरडीचे नाव आहे. घरच्या घरी तिसरीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी धूम्रपान करताना दिसणाऱ्याला धुम्रपान न करण्याची विनंती करते. समोरचा  माणूस लहान मुलीच्या या विनंतीमुळे आश्चर्यचकित होतो आणि हातातील सिगरेट फेकतो. सिगारेट फेकल्यावर छोटसं हास्य करत सिगरेट सोडण्याची कायमस्वरूपी विनंती करते. तिच्या या वागण्याने आजवर 50 हून अधिक लोकांची व्यसन दूर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या मित्र परिवारात घडलेल्या एका विदारक घटनेमुळे रिध्याच्या या मोहिमेला सुरुवात झाली. वडिलांच्या मित्राला धूम्रपान करण्यामुळे कर्करोग झाला. यामुळे मित्रांचा हा परिवार खूप हळहळला. अगदी कर्करोग झाल्यानंतरही धूम्रपान सुटलंच नाही. या मित्र परिवारासोबत चहा पिण्यासाठी  वडील चित्रेश रिध्या सोबत गेलेले असताना मित्रांनी सिगारेट फेकली आणि पायाखाली तुडवली. हे पाहून तिच्या वडिलांनी हीच मोहीम सुरू केली शरीरातील निकोटीन संपण्यासाठी 28 दिवस लागतात म्हणून 28 दिवसांची मोहीम राबवत अनेक जणांचे व्यसन रिध्याच्या मदतीने तिच्या वडिलांनी सोडविले आहे. तर आई आता कॉलेज परिसरात मुलींच्या व्यसनाधीनतिला लक्ष करणार आहे. समाजात आज अनेक व्यसनमुक्ती केंद्र आहेत. त्यात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र रिध्याने उचललेलं हे पाऊल सर्वांसाठीच आदर्श ठरत आहे. अशाच रिध्या ग्रामीण भागात निर्माण झाल्या तर समाजातील व्यसनाधीनता तातडीने दूर होऊ शकेल. 


कुणी धूम्रपान करत असेल तर त्यांना मी कश मागते. त्यामुळे ते लाजतात आणि सिगरेट फेकून देतात. मग मी त्यांना स्माईल देते मग मी त्यांना कायमस्वरूपी व्यसन सोडविण्याची विंनती करते. कुणीही सिगरेट पिऊ नये असे मला वाटत असल्याचे रिध्याने 'झी 24 तास'ला सांगितले.


तर माझी मुलगी जे काही बोलते ते पाहून अनेक लोकांचे विचार बदलतात. हे तिच्या बोलण्याची पद्धत बघून माझ्या लक्षात आले. व्यसनमुक्ती करण्याचं हेही एक महत्त्वाचं पाऊल असू शकतं आणि म्हणून तिच्या साथीने मी दररोज हे काम करत असल्याचे रिध्याचे वडील सांगतात.



समाजामध्ये धूम्रपानाचे प्रमाण आता मुलींमध्येही वाढतंय.  मुंबई-पुण्यानंतर हे व्यसन आता नाशिकमध्येही कॉलेजरोड परिसरात दिसत आहे. आता आम्ही यापुढे मुलींना या व्यसनांपासून दूर करण्याचे काम करणार असल्याचे रिध्याची आई सांगते.