भाजपात आलेल्यांना लिमलेटच्या गोळ्या दिल्यात का? - एकनाथ खडसे
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी, असा टोला लगावणाऱ्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिक : राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी, असा टोला लगावणाऱ्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना भाजपमध्ये आलेल्या लोकांना लिमलेटच्या गोळ्या देण्याची सवय असावी, अशी कोपरखळी खडसे यांनी मारली. चंद्रकांत पाटील यांनी अनेकांना कुल्फी चॉकलेट देऊन पक्षात घेतले त्यांची मर्यादा तिथपर्यंतच आहे, असे म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी कुल्फी आणि चॉकलेट देऊन इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतलंय का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपतील अनेक आमदार माझ्याही संपर्कात आहेत, असा दावा करताना मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मंत्रिपदाची अपेक्षा नाही. भाजपमध्ये चाळीस वर्षात शेटजी-भटजी यांचा पक्ष अशी ओळख होती. ती आम्ही बदलली आणि बहुजन चेहरा केला. बहुजन मुख्यमंत्री व्हावा असे म्हणताच चौकशी सुरू झाल्या होत्या, असा थेट आरोप भाजपवर खडसे यांनी केला.
मी एनसीपीत प्रवेश केला आणि राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रस्त्यात भाजपवाल्यांनीही स्वागत केले. अनेक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता दररोज कार्यकर्त्यांचे प्रवेश होतील, असे यावेळी खडसे म्हणाले.
माझ्यामागे चौकशा कशासाठी लावल्या, मी वारंवार याबाबत विचारणा केली. मात्र फडणवीस यांनी याचं समर्पक उत्तर दिले नाही, ते त्यांनी द्यावे, असे सांगताना फडणवीस लवकरात लवकर कोरोनातून बरे व्हावे, यासाठी शुभेच्छाही दिल्यात.
सीडी या शब्दाचा मी फक्त भाषणात वापर केला, येत्या काळात काय काय घडामोडी होतील ते कळेल. पक्षांतर बंदी कायद्याचा भंग न होता, कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा असल्यास जळगावातील महापालिका, नगरपालिका, सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर होईल.
भाजपमधील अनेक आमदार माझ्याही संपर्कात, पक्षांतर बंदी कायद्याचा भंग न होता अथवा आमदारांची राजीनामा देण्याची तयारी असल्यास ठरवू. माझी मंत्रीपदाची अपेक्षा नाही, उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, इतकीच इच्छा. राष्ट्रवादीत साधा कार्यकर्ता म्हणूनही काम करायला आवडेल. गेली चार वर्षे भीतीच्या छायेत वावरलो, कधी ईडी, कधी अँटी करप्शन मागे लागेल याची भीती होती. पण आता माझ्या डोक्यावरचं ओझे उतरले आहे. आता मी लोकांना टेन्शन देणार, असा इशारा भाजपला दिला आहे.