Shubhangi Patil Not Reachable: नाशिक विभागातील पदवीधर (nashik graduate constituency) निवडणुकीमध्ये पुन्हा एक ट्विस्ट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे पदवीधर निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच पाटील नॉट रिचेबल असल्याने त्या उमेदवारी मागे घेणार अशी जोरदार चर्चा नाशिकमध्ये सुरु झाली आहे.


शिवसेनेनं दिला पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या मात्र नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचा पाठिंबा मिळालेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेतील अशी जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची या निवडणुकीसाठी पाटील यांना पाठींबा देण्याच्या मुद्द्यावरुन बैठक आयोजित करण्यात आल्याचंही वृत्त आहे. मात्र पाटील यांनी माघार घेतल्यास हा ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरु शकतो.


महाजन कनेक्शनची चर्चा


शुभांगी पाटील यांच्या माघारीची चर्चा असतानाच त्या आज सकाळपासूनच नॉट रिचेबल आहे. सकाळपासूनच पाटील यांच्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही. भाजपाचे वजनदार नेते आणि संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन कालपासून शुभांगी पाटील यांच्या माघारीच्या प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे.


सत्यजित तांबेंना भाजपाचा पाठिंबा?


आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून काँग्रेसच्या पक्ष आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सत्यजित तांबे हे भाजपा पुरस्कृत उमेदवार ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


महाजन यांनी दिली प्रतिक्रिया


विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही पुत्र सत्यजित तांबेसाठी पिता सुधीर तांबेनी माघार घेतली. सध्या पाटील माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नाशिक विभागाच्या पदवीधरची निवडणूक पुन्हा नाट्यमय वळणावर आहे. शुभांगी पाटील यांच्या माघारीसाठी गिरीश महाजन यांचे भाजपाच्या प्रदेश पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना महाजन यांनी, "आम्ही शुभांगी पाटलांसोबत कोणताही संपर्क केलेला नाही," असं म्हटलं आहे. "शुभांगी पाटलांच्या मागणीनंतरच आम्ही त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला होता," असंही महाजन यांनी सांगितलं.


नागपूरमधील राष्ट्रवादीचा उमेदवारही नॉट रिचेबल


दरम्यान, दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश ईटकेलवारही नॉट रिचेबल असल्याने राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.