Hen Peacock chicks : पिसारा फुलवलेला मोर पाहायला कुणाला आवडत नाही. त्याचं हे मनमोहक रूप सर्वांनाच मनस्वी आनंद देतं. मोर हा जंगलात वावरणारा मुक्त पक्षी. मात्र एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मोराची पिल्लं चक्क कोंबडीसोबत वावरतायेत. अचंबित करणारं हे दृश्य आहे नाशिकच्या निफाडमधलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कोंबडी साधीसुधी नाही तर ती या मोराच्या पिल्लांची आईदेखील आहे. जन्मदात्या आईप्रमाणे ती या पिल्लांचा सांभाळ करते. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?



निफाडचे सहाय्यक वनसंरक्षक सुजीत नेवासे यांना मोराची पाच अंडी सापडली. त्यांनी ही अंडी निफाड वनोद्यानाचे वनपाल भगवान जाधव यांच्याकडे सोपवली. जाधव यांनी विकत घेतलेल्या कोंबडीनं पंखांखाली ही अंडी उबवली आणि त्यातून मोराच्या चार पिल्लांचा जन्म झाला. आता या पिल्लांसाठी ही कोंबडीच त्यांची आई झालीय. 


 


प्रजनन काळामध्ये लांडोर शेताच्या बांधावर किंवा जमिनीवरील काटेरी वनस्पतीत अंडी घालते. मात्र ही अंडी माणसाला सापडली किंवा अधिवासाला धोका निर्माण झाला तर लांडोर अंडी सोडून निघून जाते. लांडोरने सोडलेली अंडी या कोंबडीनं जपली. आपल्या पिल्लांप्रमाणेच मोराच्या पिल्लांना जपलं. आईपणाची महती सांगणारं हे चित्र तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेसं आहे.