नाशिकमध्ये चाललंय काय? गंगापूर रोड परिसरात महिलेला उडवलं, धक्कादायक CCTV व्हिडीओ समोर
Nashik Hit and Run Case : गेल्या दोन दिवसात नाशिकमधून दोन हिट अँड रनची प्रकरणं समोर आल्याने आता प्रशासनाला जाग आलीये. गंगापूर रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. त्याचा सीसीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.
Nashik Hit and Run : महाराष्ट्रातून हिट अँड रनची मन हेलवणारी प्रकरणं समोर येत असतानाच आता नाशिकमध्ये दोन दिवसात दोन हिट अँड रनची प्रकरणं समोर आली आहेत. दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना नाशिकच्या चांदवड - मनमाड रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला उडवल्याचा प्रकार घडला होता. अशातच नाशिकमध्ये आणखी पुन्हा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये चाललंय काय? असा सवाल विचारला जातोय.
गंगापूर रोड परिसरातील साधना मिसळ भागात हादरवणारा अपघात झाला आहे. या अपघातात 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. अपघात करून वाहन चालक फरार झाला. मात्र, अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे. नाशिकमध्ये दोन दिवसात हिट अँड रन दुसरी घटना समोर आल्याने आता नागरिकांनी रस्त्यावरून फिरावं की नाही? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
पाहा Video
नाशिक शहरात आज हिट अँड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. तर दोन आठवड्यात हिट अँड रनच्या तीन घटना घडल्या आहेत. सकाळी सिडको परिसरात अपघात करून पळ काढणा-या चालकाला जमावानं चांगलाच चोप दिला. सात वाहनांना धडक देत 5 ते 6 नागरिकांना उडवलं. तर दुसऱ्या घटनेमध्ये एका कारने 36 वर्षीय महिलेला उडवलं आणि चालक फरार झालाय. या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. गंगापूर रोडवरील साधना मिसळ पॉइंटजवळ हा अपघात झालाय. त्यामुळे आता नाशिक पोलिस खडबडून जागे झाल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांच्या सुचना
मुंबईतील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कठोर कारवाई करण्याची सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.