नाशिक : माणसाचा मृत्यू कधी आणि कसा होईल हे कधीच सांगता येत नाही. अगदी धडधाकट चालता-बोलता माणसाचाही मृत्यू (Death) ओढावतो. अशीच एक दुर्देवी घटना नाशिकमध्ये  घडली आहे. पोटात दुखत असल्याने दवाखान्यात नेता एका तरुणाचा धावत्या दुचाकीवरच मृत्यू झाला. नाशिकमधल्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील ही घटना आहे. अमोल शिरसाठ असं मृत तरुणाचं नाव असून वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
सिन्नर तुलाक्यातल्या सोनांबे गावात अमोल शिरसाठ आणि त्याची आई असे दोघेच राहतात.  माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत अमोल कामाला होता. मंगळवारी रात्री अमोलच्या पोटात अचानक दुखू (Stomach Pain ) लागलं. त्याने तसं आईला सांगितलं. पोटातल्या कळा असहाय्य होत असल्याने आईने अमोलला डॉक्टरकडे नेण्याचं ठरवलं. यासाठी तीने अमोलच्या काकांना बोलावून घेतलं. अमोलला दुचाकीने घेऊन जाण्याचं ठरलं. काका दुचाकी चालवायला स्वतः बसले. मध्ये अमोलला बसवलं आणि मागे त्याची आई बसली. अमोलला घेऊन ते दुचाकीने सिन्नरच्या दिशेने निघाले. 


अमोलच्या पोटातील कळा अधिकच वाढू लागल्याने तो कळवळू लागला होता. आई त्याला धीर देत होती, डॉक्टरकडे गेल्यावर बरं वाटेल असं सांगत त्याला आधार देत होती. दुचाकी घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आली तोच अक्रीत घडलं. अमोलला अचानक हृदयविकाराचा तीव्र (Heart Attack) झटका आला आणि त्याने जागीच प्राण सोडले. अमोल काहीच हालचाल करत नसल्याने आई आणि काका दोघंही घाबरले होते. आईने कसंसं त्याला घट्ट पकडून ठेवत सिन्नरमधल्या खासगी रुग्णलायत आणलं. 


खासगी रुग्णालयात उपचारासाठी अमोलला दाखवण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तसापणी केली, पण उपचाराआधीच अमोलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी ही बाब त्याची आई-काकांना सांगितली आणि रुग्णालयातच आईने हंबरडा फोडला. एकुलता एक तरुण वयातला मुलगा सोडून गेल्याने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.