प्लास्टीकपासून डिझेल निर्मिती करणारी देशातील पहिली मनपा
मुंबई : प्लास्टीकपासून डिझेल निर्मिती तयार करण्याचा प्रकल्प नाशिक महापालिकेने साकार केलाय. पुण्यातल्या एका संशोधकाच्या सहकार्याने या प्रकल्पातून लाखोंचं उत्पन्न सुरू झालंय. विशेष म्हणजे कचऱ्यातून निघणाऱ्या प्लास्टीकचा सदुपयोग करणारी नाशिक मनपा ही देशातली पहिलीच मनपा ठरली आहे. वेस्ट टू एनर्जी ही संकल्पना आता हळूहळू भारतात रुजू होऊ लागलीय. नाशिक महापालिकेने स्वच्छ आणि सुंदर नाशिक साकारण्यासाठी कचरा विलगीकरणाला सुरूवात केलीय.
सध्या शहरात प्लास्टीक वापराला पूर्णतः बंदी असली तरी प्लास्टीक कचऱ्यात येतं आहे ते ग्रामीण भागातल्या घरगुती वापरातून हा प्रयत्न केला जात आहे. फॉईल पॅकिंग आणि पॅकिंग पदार्थांमुळे. कचऱ्यातून याची विल्हेवाट लावताना हे प्लास्टीक स्वच्छ केलं जातं... त्याला बारीक बारीक तुकड्यात विभागलं जातं. त्यापासून प्लास्टीक ग्रॅन्युअल्स तयार करून त्यापासून डिझेल, कार्बन आणि गॅस तयार करण्यात येतोय. डिझेल एवढी शक्ती असलेलं इंधन यातून मिळतंय. वाहनंही त्यावर चालू शकतील. पण सध्या याचा वापर फर्नेस आणि इतर भट्ट्यांसाठी केला जात आहे. यातून निर्माण होणाऱ्या गॅसच्या वापरामुळे काही यंत्र चालवणे शक्य आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होईल.
नाशिक महापालिका सध्या कचऱ्यापासून वीज निर्मिती, बायोगॅस, आणि सेंद्रीय खतं आणि ग्रीन वेस्ट तयार करत आहे. इंधन निर्मितीचे असे दोन तीन उद्योग राज्यात सुरू आहेत. मात्र ते खासगी प्रकल्प आहेत. मात्र भागीदारी तत्त्वावर हे उद्योग चालवणारी नाशिक ही एकमेव महापालिका आहे. यातून महापालिकेला दरवर्षी लाखो रूपयांचं उत्पन्न मिळतंय. याशिवाय ग्रीन क्रेडीट मिळणार असल्याने नाशिकची पर्यावरणीय पत वाढणार आहे.
केंद्र सरकारच्या सचिवांनी या प्रकल्पाची पाहणी करून देशभरात हा प्रकल्प लागू करावा असं आवाहन केलंय. त्यामुळे आता हा प्रकल्प देशभरात अनुकरणीय ठरणार आहे. नागरिकांनाही इथे भेट देऊन कचऱ्याचं वर्गीकरण पाहता येणार आहे...