सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : सरकारी नोकरी मिळवून देतो अशी बतावणी करून नागरिकांना फसविणाऱ्या टोळ्या सध्या राज्यात फिरत आहेत. अश्याच एका टोळीने नाशिक मधील 62 तरुणांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तब्बल सहा कोटी दोन लाख 32 हजरांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विरेश वाबळे यांनी फिर्याद दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी झाली फसवणूक
विरेश वाबळे आणि शैलेंद्र महिरे हे शेजारी.  दोघांमध्ये घरोब्याचे संबंध.  संशयीत रमण सिंग याने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत (Indian Railway) नोकरी लावल्याची माहिती वाबळे याना मिळाली. यानंतर वाबळे यांच्या पत्नीला सुद्धा रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष रमण सिंग यांनी दाखविलं. नोकरी लावण्यासाठी सुरवातीला रमणसिंग याने वाबळे यांच्याकडून 8 लाख रुपये घेतले. या नंतर रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून बनावट नियुक्ती पत्र पाठवत अजून तीन लाख रुपये घेतले असे वेळोवेळो 11 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप वाबळे यांनी केला आहे. याच प्रकारे नाशिक जिल्ह्यतील एकूण 62 जणांची फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. 


कोलकात्यात देण्यात आले प्रशिक्षण 
वाबरे यांची 11 लाख रुपयांची फसवणूक केली. अश्याच प्रकारे नाशिक जिल्हयातील एकूण 62 जणांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 6 कोटी दोन लाख 32 हजार रुपये लंपास केले. यानंतर विश्वास निर्माण व्हावा म्हणून 25 जणांना नियुक्ती पत्र (Appointment Letter) देण्यात आलं आणि प्रशिक्षण घेण्यासाठी कोलकता इथं बोलावण्यात आलं. कोलकत्यात सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आलं. 20 हजार रुपये मानधन मिळेल असं सांगत रेल्वे स्थनाकावर तात्पुरती नियुक्ती दिल्याचं दाखवण्यात आले. 


असं फुटले बिंग 
पण सहा महिने झालेत तरी मानधन मिळत नसल्याने बनावट नियुक्ती पत्र मिळालेल्या उमेदवारांनी रेल्वे प्रबंधनकाच्या कार्यलयात विचारणा केली. पण अशी कोणतीच भरती झाली नसल्याची माहिती उमेदवारांना देण्यात आली. 


सात जणांवर गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात रमण सिंग उर्फ विशाल सिंग (रा. कोलकत्ता), राजेश सिंग (रा. कोलकत्ता), नीरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड),  संदीप सिंग (रा. रांची), जैन अली (रा. वाशी, नवी मुंबई) ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. सांगली) सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीमध्ये कोलकत्ता इथले दोन, झारखंड इथले दोन आणि महाराष्ट्रातील दोन संशयीत आहेत.