नाशिक : मंदिरातल्या दानपेटीवरुन पुजारी अन् विश्वसांमध्ये धक्काबुक्की; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Nashik News : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये विविध वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात पुजारी आणि विश्वस्तांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : देवळांचे (Temple) शहर असलेल्या नाशकात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक (Nashik News) शहरातील रामकुंड परिसरात असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या (Sri Kapaleshwar Mahadev temple) जीर्णोद्धार कामावरून विश्वस्त आणि पुजारी यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की मंदिराचे विश्वस्त आणि गुरव यांच्यात शिवागीळ आणि हाणामारी झाली. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कपालेश्वर महादेव मंदिरात दानपेटी लावणे, कॅमेरा छेडछाड करणे तसेच नवीन विश्वस्त निवडीवरून पुजारी आणि गुरव यांची विश्वस्तांच्या विरोधात एक फळी निर्माण झाली आहे. या वादातून विश्वस्त आणि गुरव यांच्यामध्ये धक्काबुक्की शिवीगाळ झाल्याचेही समोर आले आहे. यामुळे मंदिराच्या दहा गुरव व पुजारी यांच्या विरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही गैर कायद्याची मंडळी जमवून विश्वस्तांना धमक्या दिल्या जात असल्याने मंदिराच्या अध्यक्षांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मंदिरांच्या नगरीमध्ये सध्या दानपेटीवरून निवृत्तीनाथानंतर कपालेश्वर मंदिराचा वाद चिघळल्याने मंदिरांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात आला आहे.