Nashik News : मंगळवारी रात्री दोघांच्या आत्महत्येने नाशिक जिल्हा (Nashik)हादरला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्याने आपल्या पत्नीसह जीवनयात्रा संपवली आहे. सोयगाव डी. के. चौक परिसरात राहणाऱ्या पंकज दिगंबर बिरारी (वय 40) व रेणुका पंकज बिरारी (वय 35) या दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला खेळायला घराबाहेर पाठवलं आणि...


आत्महत्या करण्यापूर्वी बिरारी दाम्पत्याने नववीत शिकणाऱ्या मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवले होते. त्यानंतर दरवाजा लावून घेत पंकज आणि रेणुका यांनी गळफास घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास खेळून परतल्यानंतर मुलाने दरवाजा ठोठावला. यावेळी मुलाने सातत्याने मम्मी-पप्पा अशी हाक मारली. तरीही कोणीही दरवाजा उघडला नाही. बराच वेळ झाल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने घाबरलेल्या मुलाने शेजारच्यांना हा सर्व प्रकार सांगितला. शेजारच्यांनीही सुरुवातीला पंकज आणि रेणुका यांना दरवाजा उघडण्या सांगितले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही.


गळफास घेत संपवली जीवनयात्रा


कोणताही पर्याय नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी पंकज आणि रेणुका हे दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बिरारी दाम्पत्याचे घर गाठले. पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत.


कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा


पंकज बिरारी हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे धडाडीचे कार्यकर्ता होते. बिरारी यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय होता. मात्र त्यांनी टोकाचे इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि खासगी कंपनीच्या त्रासातून बिरारी यांनी गळफास घेत जीवन संपवले अशी परिसरात चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी पंकज बिरारी यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही म्हटले जात आहे.