योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नांदेडमध्ये (Nanded) शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरसह नागपुरच्या शासकीय रुग्णालयातही मृत्यू तांडव पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्ये (Nashik) प्रसुतीदरम्यान (delivery) एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना हा सगळा प्रकार कळताच त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेवटी रुग्णालयात पोलिसांना (Nashik Police) पाचारण करावं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात हा सगळा प्रकार घडला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसुतीचे शिक्षण दिले जात असते. प्रसूती कशी करावी यासाठी अनेक वेळेस  वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रसूतीवेळी प्रात्यक्षिक शिकाऊ विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवत असताना नाशिकच्या जाधव कुटुंबीयांच्या मुलाचा बळी गेला आहे. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमध्ये फाल्गुनी जाधव या आपल्या प्रसुतीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्या होत्या.


रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दहा मिनिटांपूर्वी या अर्भकाच्या हृदयाचे ठोके अपेक्षित असे होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी फाल्गुनीला हे ठोके दाखवून तिची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रसुती करताना अर्भक हातातून निसटल्याने खाली पडले आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप फाल्गुनीच्या पतीने केला आहे.


दरम्यान, बराच वेळ पालकांना याची कल्पना देखील देण्यात आली नव्हती. मात्र रुग्णालयात गोंधळ वाढत गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृत अर्भकाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून विसेराचा अहवाल छत्रपती संभाजीनगरमधून येणार आहे. दरम्यान महाविद्यालयातल्या अधिक्षकांनी बाळाचा आधीच मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे.