Video : पिशवी आत राहिली म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अन्... शिर्डीत साईभक्तांना मारहाण
Sai Baba Temple : रामनवमी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भाविकांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे.
कुणाल जमदाडे, झी मीडिया, नाशिक : रामनवमीनिमित्त (Ram Navami) शिर्डीच्या (Shirdi) साई मंदिरात (Sai Baba Temple) तीन दिवस मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशभरातून साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाल्या आहेत. रामनवमी निमित्त काही पालख्याही शिर्डीत आल्या आहेत. मात्र शुक्रवारी या उत्सवाला गालबोट लागले. मंदिरात प्रवेश करण्यावरुन साई मंदिराचे सुरक्षा रक्षक (security guard) आणि साई भक्तांमध्ये मारहाणीची घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. हे प्रकरण आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. पोलिसांनी साई भक्तांच्या तक्रारीवरुन सुरक्षा रक्षकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. यासोबत साईसंस्थानच्या सुरक्षारक्षकांना भक्तांना मारहाण न करण्याची तंबी देखील दिली आहे.
मुंबईहून शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने पायी पालखी घेऊन येणारे साईभक्त आणी सुरक्षारक्षकात शुक्रवारी मारहाणीची घटना घडलीय. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताला आपली पिशवी आत राहिल्याचं आठवल्यानंतर त्याने पाच नंबर गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणी त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. सुरक्षारक्षकाने भक्तांना मारहाण केल्याने साईभक्तांच्या सुरक्षेसाठीच हे रक्षक आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. भक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे..
पोलिसांनी काय सांगितले?
"शिर्डी साईमंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकूण पाच गेट आहेत. त्यातील गेट क्रमांक पाच हे बाहेर पडण्यासाठी आहे. शुक्रवारी संध्याकाळी काही भाविक एक्झिट गेटने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि भाविक पोलीस ठाण्यात आले. माहिती घेतली असता भाविक बाहेर पडण्याच्या गेटने आतमध्ये प्रवेश करत होते असे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला दोघांमध्ये वाद झाल्यानंतर धक्काबुक्की झाली. याचा व्हिडीओ आम्हाला मिळाला आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकाकडून भाविकांना मारहाण झाल्याचे दिसले. भाविकांनी मारहाणीबाबतची तक्रार दिली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत," अशी माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
सुरक्षा रक्षकांनी कायदा हातात घेऊ नये
"भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना ज्या गेटमधून त्यांना प्रवेश आहे तेथूनच प्रवेश करावा. जेणेकरुन सुरक्षा रक्षक आणि पोलिसांसोबत वाद होणार नाही. त्यामुळे जिथून प्रवेश आहे तिथूनच भाविकांनी आत जावे. सुरक्षा रक्षकांनाही याबाबत सूचना दिल्या असून असा प्रकार झाल्यानंतर भाविकांसोबत वाद न घालता त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. परस्पर कायदा हातात न घेता सुरक्षा रक्षकांनी कारवाई करु नये," अशा सूचना नंदकुमार दुधाळ यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, शिर्डीत भक्तांना मारहाण होण्याची ही पहिली वेळ नाही. अनेकदा साईभक्तांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने बोलणे अपेक्षित असते. मात्र शिर्डीत चित्र उलटे आहे. भक्ताशी अनेकदा उद्धटपणे बोलल्याचे समोर आले आहे.