योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आई तुळजाभवानीच्या मंदिरात ड्रेसकोडचा (Shri Tuljabhavani Temple) वाद ताजा असतानाच सप्तशृंगी गडावरही (Saptashrungi Devi) ड्रेसकोड (Dress Code) लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खुद्द वणी ग्रामस्थांनीच ड्रेसकोडचा ठराव मंजूर केलाय. महिलांनी पूर्ण कपड्यांमध्येच दर्शनाला यावं, पुरुषांनी भारतीय पेहराव करावा असा ठराव करण्यात आलाय. ड्रेस कोडच्या ठरावाची प्रत सप्तशृंगी देवस्थानाला देण्यात आलीय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर मंदिरांमध्ये व्यवस्थापनानं ड्रेसकोड लागू केला होता. इथं स्वत: वणी गावचे ग्रामस्थ ड्रेसकोडसाठी आग्रही आहेत. तर ड्रेसकोडबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं संस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. सप्तश्रृंगी ग्रामपंचायत आणि सप्तश्रृंगी गड देवस्थानने संयुक्तरित्या हा निर्णय घेणार आहेत. महिलांचं अंगप्रदर्शन होऊ नये यासाठी ड्रेसकोडचा नियम घालण्यात आला आहे आणि पुरुषांनीही भारतीय पोषाख परिधान करावा अशी अपेक्षा असल्याचं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे. 


ड्रेसकोडच्या या संभाव्य निर्णयाचं भाविकांकडूनही (Devotee) स्वागत करण्यात आलंय. देवदर्शनाला आल्यावर पूर्ण कपडेच घालावेत आपण पर्यटनाला येत नाही असं भाविकांचं म्हणणं आहे. तर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याच्या भूमिकेला भाजपनंही पाठिंबा दिलाय. हिजाब घालण्यासाठी त्या धर्माची लोकं अतिशय कडक भूमिका घेतात, कोणतीही तडजोड करत नाहीत. त्याच पद्धतीने प्रत्येक हिंदूंनी आपल्या मंदिरात आचारसंहिता पाळावी त्यात काही तडजोड करता कामा नये, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 


मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. तिथं गरीब-श्रीमंत, जात-धर्म असा भेदभाव केला जात नाही. कपड्यांचं म्हणाल तर बोटावर मोजण्याइतपत अपवाद वगळले तर कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत याचं भान ज्याचं त्याला असतंच.. त्यामुळं असे निर्बंध लादण्याची आणि ड्रेसकोड लागू करण्याची खरचं गरज आहे का? हाच खरा सवाल आहे. 


तुळजापूर मंदिराने निर्णय घेतला होता मागे
दरम्यान, तुळजाभवानी मंदिरातही काही दिवसांपूर्वी ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. मंदिरात प्रवेश करण्यासाठी हाफ पॅन्ट, बर्मुडा अशा वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्यात आलीय, असे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. पण हा निर्णय त्यांनी तात्काळ मागे घेतला. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा अर्चा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत, असा खुलासा तुळजाभवानी  मंदिर व्यवस्थापकांनी केला. तुळजापूरचे तहसीलदार आणि मंदिर व्यवस्थापकांनी नवा आदेश जारी केला.