चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक  : पी. एम. किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी येवला तालुक्यातील चिंचोडी गावातील एका शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. पण ज्यावेळी त्याला पावती मिळाली त्यावेळी त्याला मोठा धक्का बसला. हा शेतकरी जिवंत असताना त्याला चक्क मृत दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे या शेतकऱ्याला पीए किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागल्याची घटना महाराष्ट्रात समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा या करीता 2018 सालापासून पी.एम किसान योजना चालू केली होती. 2018 साली येवला तालुक्यातील चिचोंडी शेतकरी त्रंबक बाबुराव निकम यांनी पी.एम किसान योजनेचा ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. मात्र ज्या वेळेस या शेतकऱ्याला पावती हातात मिळाली त्यावेळेस तो त्यात जिवंत असताना देखील मृत घोषित करण्यात आलं होतं. 


त्रंबक निकम यांनी गावातील तलाठ्याला याबाबत विचारले असता तलाठ्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाली. त्यामुळे शेतकऱ्याने येवला तहसीलदार यांच्याकडे देखील याबाबत अर्ज केला.  मात्र तिथेही त्यांची दखल घेतली गेली नाही. अखेरीस या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. पण दुर्देवाने तिथूनही त्यांना अद्याप कोणतंच उत्तर आलं नाही.


आपण जिवंत असल्याने पी. एम किसान योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी त्रंबक निकम यांनी केली आहे. तर त्र्यंबक निकम यांचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे दाखल झाला मात्र चिचोंडी गावातील तलाठ्याकडे विचारणा केली असता हा शेतकरी जिवंत असून याचा प्रस्ताव तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून तिकडून मंजुरी मिळाल्यावर त्या शेतकऱ्याचे पी.एम किसान योजनेचा लाभ सुरू करण्यात येईल असं उत्तर तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिलं आहे.