Nashik News : डॉ. प्रियंका पवार यांच्या धाडसाला सलाम! गरोदर असतानाही अॅम्ब्युलन्सचे स्टेअरिंग हाती घेतले अन् वाचवले रुग्णाचे प्राण
Nashik News : पोटात एक जीव असतानाही कसलीही पर्वा करता या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने तिच्या रुग्णाला सुखरुप रुग्णालयात पोहोचवलं आहे. वेळत रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्याने त्याचावर वेळेवर उपचार करण्यात आले असून त्याचे प्राण वाचले आहेत
चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधील (Nahik News) येवल्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ( health center) एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतः अॅम्ब्युलन्स (ambulance) चालवत एका रुग्णाचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही महिला वैद्यकीय अधिकारी गरोदर (pregnant medical officer) असताना त्यांनी कशाचीही पर्वा न करत एका रुग्णाचे प्राण वाचवले आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या धाडसाचे आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. वेळेवर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पोहचवल्याने त्याच्यावर पुढील उपचार करता आले आहेत.
म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार या स्वतः रुग्णवाहिका चालवत निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्या होत्या. म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रावर एका रुग्णाची प्रकृती खालावली होती. या रुग्णाने विष प्यायल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. प्राथमिक केंद्रात उपचारानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची गरज होती. यावेळी डॉ. प्रियंका पवार या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होत्या. त्यांनी रुग्णाची परिस्थिती पाहून तात्काळ त्याला निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. या रुग्णाला रुग्णवाहिकेतून निफाडला नेण्याचे ठरवण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेचा चालकच रजेवर असल्याने मोठी अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच कसलीही पर्वा न करता डॉ. प्रियंका पवार यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. प्रियंका पवार या गरोदर असतानाही त्यांनी हा निर्णय घेतल्याने थोडीशी मनात भीती निर्माण झाली होती. मात्र प्रियंका पवार यांनी धाडसीपणाने रुग्णवाहिका चालवत रुग्णाला निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. त्यानंतर या रुग्णावर पुढील उपचार सुरु करण्यास सुरु करण्यात आले आहे. दुसरीकडे सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाकडून वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका पवार यांचे कौतुक करण्यात येत आहे.