योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील हत्या सत्र थांबविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. आज हत्येच्या आणखी एका घटनेने नाशिक हादरलं. दुचाकीवरुन आलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाचा खून केला. या घटनेने किशोरवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
महात्मा नगर परिसरात राहणारे नंदकुमार आहेर यांचा ऑटोमोबाईल पार्ट तयार करण्याचा व्यावसाय आहे. अंबड औद्योगिक वसाहतीमधील गरवारे पॉईंट जवळील सीमेन्स कंपनीसमोर ही शेडमध्ये छोटी कम्पनी आहे. नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर आज सकाळी कंपनीत आले. कंपनीजवळ कारमधून उतरत असतानाच आधीपासून काही अंतरावर वाट पहात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.


आहेर यांचा आरडाओरडा ऐकून कंपनीत काम करणारे धावत बाहेर आले, आहेर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 


हल्ल्यामागचं कारण काय?
नाशिक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर वीस वर्षाच्या आतील असून त्याची आई आहेर यांच्या कंपनीत कामाला होती. कंपनीत तिचा छळ आणि अपमान होत असल्याचं तीने आपल्या मुलाला सांगितलं होतं. याचा बदला घेण्यासाठी मुलाने आहेर यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलं असून दोघांचा शोध सुरु आहे. 


नाशिक शहर व परिसरामध्ये मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली खुनाची मालिका अद्यापही संपता संपत नसल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये नाशकात झालेली खूनाची ही आठवी घटना आहे. यामुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.