घराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू
Nashik Accident News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघेही घरी जात असताना हा अपघात झाला.
चेतन कोळस, नाशिक, झी मीडिया : नाशिकमध्ये (Nashik News) अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या निफाडमध्ये (Niphad) बाईकवरुन जाणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिन्ही तरुण एकाच बाईकवरुन रात्रीच्या सुमारास घरी निघाले होते. त्याचवेळी बसची धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत बाईकवरुन क्लासला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी जखमी झाले आहे. स्थानिक पोलिसांनी (Nashik Police) या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.
बस व दुचाकीमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा येथे घडली आहे. रात्रीच्या सुमारास हे तिन्ही तरुण आपल्या घरी जात असताना त्यांना बसची धडक बसली. या धडकेत तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही तरुण शिरवाडे वणी या गावातील होते. महेश निफाडे, सुभाष निफाडे, नितीन निफाडे अशा मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघांच्याही मृत्यूने शिरवाडे वणी गावात शोककळा पसरली आहे.
बाईक अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू
तर दुसरीकडे मंगळवारी सकाळी सातपूर अंबड लिंक रोडवर क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. तिन्ही विद्यार्थी एका बाईकवरून क्लासला जात होते. त्यावेळी त्यांची बाईक दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातात सार्थक दामू राहणे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक व त्याचे दोन मित्र असे तिघेजण मोटरसायकल वरून आज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान क्लाससाठी जात होते. त्याचवेळी सातपूर अंबड लिंक रोडवर सार्थकचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला जाऊन धडकली.
स्कूल व्हॅनचा भीषण अपघात
नाशिकमध्ये सोमवारी सकाळी तपोवन परिसरात स्कूल व्हॅन आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनला एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र जोरदार धडक बसल्याने काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरीत विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहचवण्यात आले. या अपघातात स्कूल व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.