नाशिक : महाराष्ट्राला हादवणारी घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. नाशिकरोड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरगुती वादातून पत्नी , सासरे आणि सासू यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू मृत्यूशी झुंज देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय
सूरज उगलमुगले हा नाशिकरोड पोलिस दलात कार्यरत आहे. सूरजला जुगार आणि सट्टा खेळण्याचा नाद होता. जुगारात कर्जबाजारी झालेला सूरज वारंवार सासऱ्याकडे पैशांची मागणी करत होता. पण सासऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सूरज संतापला होता.


शनिवारी रागाच्या भरात सूरजने सासरे निवृत्ती सांगळे, पत्नी पुजा आणि सासू शिला सांगळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. हल्ला करुन सूरज फरार झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सासरे निवृत्ती सांगळे यांचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


पोलिसांनी सूरजची आई अलका उगलमुगले हिला अटक केली असून सूरजला साथ देणाऱ्या इतरांनाही अटक करावी अशी मागणी नातलगांनी केली आहे. 


सूरजची पत्नी पूजाने सूरज विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनाही सहआरोपी करावं अशी मागणी सांगळे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.