शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या धुमश्चक्री प्रकरणी पोलिसांची कारवाई
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
नाशिक : शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या धुमश्चक्री प्रकरणी पोलीस आता आक्रमक झाले आहेत. भद्रकाली पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दहा जणांना अटक करण्यात आली असून बारा जणांचा शोध सुरू आहे.
भद्रकाली पोलिसांच्या दोन टीम दगडफेक करणाऱ्यांच्या शोधात रवाना झाले आहे. दगडफेकीचे व्हिडीओ तपासून नावे निष्पन्न केली जाणार आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांचा कायद्यापुढे मुलाहिजा नाही असं पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे तणाव निर्माण करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सकाळपासूनच विविध ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी सेना-भाजपचे कार्यकर्ते समोरा-समोर आले. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. नारायण राणे यांना कोणत्या कलमाअंतर्गत अटक केली गेली आहे. अजून समोर आलेलं नाही. राज्यात ३ ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.