योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात (Nashik Saptashrungi Bus Accident) 1 महिला ठार झाली तर 20 प्रवासी जखमी झालेत. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहेत. सकाळी सातच्या सुमारास गणपती पाईन्टजवळ घाट उतरत असताना बस 200 फूट दरीत कोसळली. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.14 गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही अपघातासंदर्भात माहिती घेतली आणि तातडीच्या मदतीचे प्रशासनाला आदेश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयचा असंवेदनशीलपणा
नाशिकच्या बसला अपघातात जखमी झालेल्यांबाबतची असंवेदनशिलता समोर आलीय. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik District Government Hospital)  दाखल करण्यात आलेल्या जखमींच्या चक्क कपाळावर स्टिकर (Sticker) लावण्यात आले आहेत. जखमी व्यक्तींची ओळख होण्यासाठी त्यांच्या हातावर किंवा बेडवर नावाचे स्टिकर्स लावण्यात येतात. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींच्या कपाळावरच स्टिकर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय..


तर अपघात टळला असता
नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील बस अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीये. गेल्या महिन्यात सप्तशृंगी गडावर दरड कोसळल्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घाटातील रस्ता दुरुस्तीचे पत्र दिले होते. मार्गदर्शक साइन बोर्ड खड्डे बुजवणे कठडे दुरुस्त करणे याबाबत तातडीने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. अपघातस्थळी सुरक्षा  उपाययोजनांच्या मागणीची दखल घेतली असती तर हा अपघात टळला असता. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसंच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.