किरण ताजणे, झी २४ तास नाशिक : अमळनेरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धुमश्चक्रीत किती दुखापत झाली की नाही हे माहिती नाही. पण ज्या नाशिकचे ते पालकमंत्री आहेत त्या नाशकातील काही कार्यकर्त्यांना मात्र त्यांची भलतीच काळजी दिसून आली. या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांसाठी चक्क बाम आणि मलम भेट पाठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिककरांनी केलेली ही स्टंटबाजी आहे हे काही लपून राहिलेलं नाही. मलमाची ही भेट महाजनांच्या आरामासाठी नक्कीच पाठवण्यात आलेली नाही. गिरीश महाजन या विरोधकांना कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल.


अमळनेरमध्ये गुरुवारी भाजपाचा मेळावा सुरू असताना, मंचावर बसलेले भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बी एस पाटील यांना मंचावर मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. यानंतर मंचासमोरील कार्यकर्त्यांनी मंचावरून बीएस पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच एका कार्यकर्त्याने पाय ओढत बीएस पाटील यांना मंचावर ओढले, कार्यकर्ते मंचावर चढू नयेत म्हणून, गिरीश महाजन कार्यकर्त्यांना अडवताना दिसत आहेत. हा वाद भाजपाचे तिकीट देण्यावरून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या आमदाराला मारहाण झाली, ते बी एस पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून ३ वेळेस निवडून आले आहेत.


तिकीट वाटपावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे, जेव्हा भाजपाचे खासदार एटी पाटील यांना तिकीट मिळालं नाही, तेव्हा पारोळा शहरात एटी पाटील यांनी एक सभा घेतली होती, त्या सभेत बीएस पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी, तसेच भाजपाच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपाचे देण्यात आलेले तिकीट नाकारण्यात आलं होतं. यावरून हा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे.


जळगाव लोकसभेचं भाजपाचं तिकीट आमदार स्मिता वाघ यांना नाकारून, ते आता ऐनवेळी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना देण्यात आलं आहे. यावरून हा आज हा वाद अमळनेरच्या भाजपा मेळाव्यात उफाळून आला, आणि भाजपाचे माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.