तक्रारी वाढल्याने रिक्षा चालक नाशिक पोलिसांच्या रडारवर
पोलिसानीच केलं रिक्षा चालकांचं स्टिंग ऑपरेशन
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधील रिक्षाचालकांच्या तक्रारी वाढल्याने नाशिक पोलिसांनी रिक्षा चालकांना रडारवर घेतलं आहे. स्वतःच नाशिक शहर पोलिसांनी रिक्षा चालकांना वठवणीवर आणण्यासाठी वेशभूषा बदलत रिक्षा चालकांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. तीनशेहून अधिक जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
नाशिक शहरात पोलिसांनी रिक्षा चालकांच्या विरोधात कठोर पाऊल उचललं आहे. सध्या नाशिकमध्ये २६ हजारांहून अधिक रिक्षा धावत आहेत. त्यात २३ हजार ४२६ रिक्षा चालकांकडेच परवाना आहे. दिवसेंदिवस रिक्षा चालकांची मुजोरी, तक्रारी वाढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनीचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्यामुळे रिक्षा चालक चांगलेच धास्तावले आहेत. या कारवाईत आतापर्यंत १०६ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ३२२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर जवळपास पाऊण लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर आरटीओ प्रशासनानेही कारवाई सुरू केलीय. यावेळी पोलीस आयुक्तालयात संयुक्त बैठकही पार पडली आहे. रिक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून नव्या नियमावलीची माहितीही देण्यात आली आहे.
या कारवाईनंतर रिक्षाचालकांकडून सुरू असलेली पिळवणूक थांबेल अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नाशिककरांनी व्यक्त केली आहे.