राष्ट्रीय खेळाडूवर चोरट्यांचा कोयत्याने प्राणघातक हल्ला
राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये निखिल जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या सर्व घटनेमुळे निखिलला दोन दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. मंगळवारी रात्री सराव करुन येत घरी जात असताना चोपडा लॉन्स येथील पेट्रोल पंपासमोर त्याला चोरट्यांनी रोखले. निखिलला लुटण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी निखिलला अडवले. मात्र त्याच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. निखिलकडे काहीच न मिळाल्याच्या रागातून चोरट्यांनी निखिलवर कोयता आणि चाकून हल्ला करत बेदम मारहाण केली.
नाशिक शहरात दिवसेंदिवस चोऱ्या, प्राणघातक हल्ल्याचे प्रकार वाढत असताना आता खेळाडूही असुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्रातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.