किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : नाशिकच्या चुरशीच्या ठरलेल्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग उडवून लावत भाजपनं सत्ता हातात घेतली आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झालीय. संख्याबळ जुळत नसल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराकडून निवडणुकीत माघार घेतली गेली. तर कुलकर्णी यांच्याविरोधात भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, नाशिकमध्ये महापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी १० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीत उपमहापौरपदी भाजपच्या भिकुबाई बागुल यांचीही बिनविरोध निवड करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या नवनिर्वाचित उपमहापौर भिकुबाई बागुल या ७९ वर्षांच्या आहेत. भिकुबाई या भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुनील बागुल यांच्या मातोश्री आहेत. राज्यात भिकुबाई बागुल या सर्वाधिक वयाच्या उपमहापौर ठरल्या आहेत. 


नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी

भाजपच्या बंडखोर नगरसेवकांपैकी कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत येऊन महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेनं भाजपला दिलेला हा मोठा धक्का मानला जात होता. परंतु, भाजपनं सेनेच्या या शहाला काटशह देत महापालिकेवर ताबा मिळवलाय. याचाच भाग म्हणून, आज नाशिकच्या महापौर निवडणुकीत अचानक ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपचे फुटीर नगरसेवक परत भाजपच्या तंबूत परतले. महापौर पदासाठी सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यानं फुटीर नगरसेवक परतल्याचा दावा फुटीर नगरसेवकांनी केला.