किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला आणि त्याच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. विनोदबाबा ऊर्फ तुकाराम हिरे असं या भोंदूबाबाचं नाव... पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून या भोंदूबाबानं बलात्कार केल्याची तक्रार एका पीडित महिलेनं गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदवलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिलेला झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी त्यानं पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवलं. महिलेसोबत बनावट पद्धतीनं लग्न करून पूजा केल्याचं भासवलं. त्यानंतर तिच्यासोबत बळजबरीनं शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेनं केलीय.


तक्रारीनंतर गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबाचा साथीदार राजेंद्र गायकवाड आणि अशोक पवार यांना ओझरमधून अटक केली तर भिवंडीत लपलेल्या भोंदू विनोदबाबाच्या मुसक्याही आवळल्या गेल्याची माहिती नाशिक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिलीय. 



दरम्यान, या फसवणूक प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. त्या फरारी महिलेचा तपास सुरू आहे. अशा फसव्या भोंदूबाबांवर विश्वास ठेवू नका, असं पोलीस कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पण फसवणूक झाल्यानंतरच अनेकांचे डोळे उघडतात, हे दुर्दैव...