योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेंढ्या शेळ्या कुठल्या गोठ्यात वा शेतकऱ्यांच्या शेतात नव्हे तर चक्क नाशिकच्या विमानतळावरील हल्कोन या कार्गो एअरपोर्टवर दिसत आहेत. बकरी ईदसाठी हवाई मार्गाने त्यांना थेट अरब राष्ट्रमधील वेगवेगळ्या देशांत नेण्यात येत आहे. भारतीय बकरे, बोकड, शेळ्या मेंढ्याना अरब राष्ट्रात प्रचंड मागणी आहे. 


गेल्या वर्षापासून समुद्रमार्गे जाणाऱ्या भारतीय शेळ्या आता ओझरवरून थेट विशेष विमानाद्वारे ही नेल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार एका फ्लाईटमध्ये १२०० मेंढ्या नेल्या जातात. त्यानुसार पन्नासहून अधिक कार्गो फ्लाईट नाशिकहून उड्डाण करणार आहेत.


नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे पूरक उद्योग मिळाला आहे. शेळी-मेंढी व्यावसायिक या माध्यमातून लाखो रूपयांचं परकीय चलन मिळवू लागलेत. नाशिकची द्राक्षं जगभरात प्रसिद्ध आहेतच आता शेळी मेंढी पालनाचा व्यवसायही यशस्वी होताना दिसतोय. 


शासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने नाशिककरांना विमानसेवेचा लाभ होत नाही. मात्र शेतकऱ्यांनी जिद्दीने थेट न्यायालयीन लढाई लढत शेळ्या मेंढ्यांना हवाई मार्गाने साता समुद्रापार नेऊन दाखवलंय. या पूरक उद्योगाने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झालाय.