निलेश वाघ, झी मीडिया, कळवण : पावसामुळे नाशिकच्या कळवण तालुक्यातील रवळजी पवारवस्ती रस्ता पाण्याखाली गेल्याने सुमारे २०० लोकवस्ती असलेल्या पवारवस्तीचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना अक्षरशः दोराच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे, रुग्णांचेही खूप हाल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिनाभरापासून कळवण तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असून पावसामुळे रवळजीच्या मोठ्या दरीवर असलेला पाझर तलाव भरलाय. तलावातील पाण्याच्या फुगवट्यामुळे रवळजी ते पवारवस्ती रस्ता पाण्याखाली गेला आहे. पवारवस्तीच्या ग्रामस्थांना संपर्कांसाठी एकमेव रस्ता असल्याने या गावाशी संपर्क तुटला आहे.


नाल्यामध्ये चार ते पाच फूट पाणी आहे. तर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे असून डोक्याच्यावरपर्यंत पाणी असल्याने  ग्रामस्थांना अक्षरशः नाल्याच्या दोन्ही बाजूने दोर बांधून पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळा नाल्याच्या पलीकडे असल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन पाण्यातून माग काढत शाळेत सोडावे लागत आहे.


विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रवळजी ते पवारवस्ती रस्त्यावरच्या मोठ्या नाल्यावर २०१३ साली फरशी पुलाला मंजुरी देण्यात होती. या कामाचे उदघाटनही पार पडले. मात्र निधीच्या कमतरतेमुळे काम अपूर्ण राहिले. कामासाठी आणण्यात आलेली खडीही या ठिकाणी तशीच पडून आहे. फरशी पुलाचे काम अर्धवट राहिल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाझर तलाव भरल्यानंतर फुगवट्याच्या पाण्याखाली रस्ता जातो. 


गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नाल्याच्या पलीकडे असल्याने मोठी अडचण निर्माण होते. गावाशी संपर्कच तुटल्याने शेकडो क्विंटल कांदा विक्रीअभावी पडून आहे. तर शेतमालही शेतात सडत पडला आहे. मोठया नाल्यावर फरशी पूल बांधण्याची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी स्थानिक, प्रतिनिधी व प्रशासनाकडे केली. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने पावसाळ्याचे चार महिने पवार वस्तीच्या ग्रामस्थांच्या नशिबी दोराच्या साहाय्याने पाण्यातून प्रवास करणेच येते. त्यामुळे   ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 


सर्वत्र दळणवळणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवास सुकर झाला असला तरी पवारवस्तीच्या ग्रामस्थांना आजही मानेएवढ्या खोल पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी पवारवस्तीच्या नागरिकांचा  जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी प्रयत्न करेल का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.