अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरहून लवकरच वर्धा, काटोल, भंडारा, रामटेक ही शहरंही लोकल मेट्रोने जोडण्याचा मानस आहे. हा प्रस्ताव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रस्ताव सुचवलाय. 


काय आहे प्रस्ताव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो रेल्वेतर्फे रेल्वे विभागाकडे हा प्रस्ताव केला जाईल. या शहरांना जोडणारी तोट्यातली पॅसेंजर सेवा रद्द करून त्या मार्गावर रेल्वे लाईन वापरून मेट्रो चालवण्याचा मानस आहे. नागपूरहून भंडारा, वर्धा, काटोल, रामटेक यासह परिसरातली शहरं रेल्वेने जोडली जाण्याचा प्रस्ताव आहे. या शहरांसाठी नागपूरमार्गे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पॅसेंजर गाड्या चालवल्या जातात. 


नागरिकांना होणार फायदा


मात्र याचा वापर फारसा केला जात नाही. ग्रामीण क्षेत्रातून नागपुरात दररोज अनेक व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी नागपुरात ये जा करतात. मात्र या पॅसेंजर गाड्या फार गैरसोयीच्या वेळी आहेत. तसंच त्या धीम्या गतीने धावतात. त्याऐवजी या मार्गावर वेगवान मेट्रो लोकल सेवा चालवली तर वेळेची बचत होईल. तसंच प्रवाशांना आरामदायी एसी सेवा मिळेल. त्यामुळे या सेवेचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला गडकरींनी दिलाय. 


पॅसेंजर सेवा बंद करणार


हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या मार्गावरच्या पॅसेंजर सेवा बंद होतील आणि त्याऐवजी त्या मार्गावरच्या रेल्वे लाईनवरून महामेट्रोतर्फे मेट्रो सेवा चालवता येईल. तीन डब्ब्यांच्या चार गाड्या नागपूर शेजारचे चार जिल्हे आणि तालुक्यांना जोडतील. त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि स्वस्त, आरामदायी सेवा उपलब्ध होईल.